devi Saraswati

माता सरस्वती 

माता सरस्वती, वाग्देवी, शारदा. ज्ञानाची इच्छा धरणाऱ्याला ज्ञानसंपदा प्रदान करणारी. तसेच विद्या, कला, संगीत आणि वाणीची देवता. ही श्वेत वस्त्रांमध्ये एकदम उज्वल असून तिचे वाहन शुभ्र हंस आहे. ही श्वेत पुष्प आणि मोती धारण करते. त्यामुळे श्वेत (पांढरा) रंग सरस्वतीचे प्रतीक मानला जातो. कारण ज्ञानाच्या प्रकाशासमोर अज्ञानाच्या अंधाराची काळिमा राहत नाही. हा श्वेत रंग पवित्रता, शुद्धता, विद्या, आणि शांतीचे प्रतीक आहे.


या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा||

अर्थ  - जी कुंदाचे फुल, चंद्र, बर्फ, आणि हारासमान श्वेत आहे. जी शुभ्र वस्त्र परिधान करते. जिच्या हाती उत्तम वीणा सुशोभित आहे. जी श्वेत कमळाच्या आसनावर विराजमान आहे. ब्रम्हा, विष्णू व महेश आदी देव जिची सदैव स्तुती करतात. जी सर्व प्रकारची जडता हरते. ती भगवती सरस्वती माझे पालन करो.

दुर्गादेवीच्या ९ अवतारांमध्ये हा अवतार महत्वाचा मानला जातो. नवरात्रीमध्ये पंचमी ते नवमीपर्यंत सरस्वती पूजा केली जाते. पंचमी ला घटस्थापना करून नवमीला सरस्वती विसर्जन केले जाते. 


वसंत पंचमी 
विशेष अर्थाने देवी सरस्वतीची पूजा वसंत पंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला केली जाते. कारण याच दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता. पांढरा रंग सरस्वतीला प्रिय असला तरी या दिवशी पिवळ्या रंगाचे महत्व अधिक आहे. कारण हे पर्व खऱ्या अर्थाने ऋतुराज वसंताच्या आगमनाची सूचना देते. वसंतात वृक्षांना पालवी फुटते. मोहरीच्या फुलांनी धरती पिवळी होऊन जाते. ही मोहरीची फुले सरस्वतीला अर्पण केली जातात. तसेच पूजेच्या वेळी पिवळी वस्त्रे परिधान केली जातात. पिवळा रंग हा शुद्ध, शुभता आणि सात्विकतेचे प्रतीक मानला आहे.

सरस्वती यंत्र 
शालेय जीवनात असल्यापासून आपण पाटीपूजन करत आलोय. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर फक्त महाराष्ट्रात देवी सरस्वतीचे या प्रतिकाच्या स्वरूपात पूजन केले जाते.


१ या अंकातून निर्माण झालेले सरस्वती देवीचे प्रतीक काढून दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रभर सरस्वती पूजन केले जाते. 

यातील १ हा अंक सरस्वतीचे वाहन शुभ्र हंस आणि सरस्वतीचे वाद्य वीणा यांचे प्रतीक आहे. हंसाची एक विशेषता म्हणजे नीर (पाणी) - क्षीर (दूध) विवेक. म्हणजेच पाणी आणि दूध वेगळे करण्याची क्षमता. अर्थात अचूक ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, पात्रता. 

यातील डावीकडून उजवीकडे जाणारी रेषा भविष्यकाळ, नावीन्य व पूर्व दिशा सुचवते. 

तसेच उजवीकडून डावीकडे जाणारी रेषा ही भूतकाळ, इतिहास, खोल अभ्यास आणि पश्चिम दिशा सुचवते.

१ या अंकातून खाली येणाऱ्या रेषा म्हणजे अभ्यास व आकलन करणे 

खालून वरच्या दिशेने १ या अंकाजवळ वर्तुळाकार होणाऱ्या रेषा म्हणजे प्रगती आणि परिपूर्णता.

या प्रतिकाचे खालच्या बाजूने निरीक्षण केल्यास ते एक बीज असल्याचे भासते. ते बीज एकाचे दोन, दोनाचे तीन असे एकापासून अनेक होत अनंत पर्यंत जाऊ शकते. अर्थात ज्ञान हे अनंत, असीम आहे. 
त्यामुळे हे वृद्धीचे (ज्ञानवृद्धी, शक्तीवृद्धी, धनवृद्धीचे) ही चिन्ह आहे.

अशाप्रकारे माता सरस्वतीची उपासना करून प्रत्येक साधक सरस्वतीकृपेने उच्च स्तरांचे दोषरहित ज्ञान प्राप्त करू शकतो.

---------------------------------

पूजा लखामदे © 2021 
Instagram - indian_epic_art


टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

लोकप्रिय पोस्ट